धरणगाव, प्रतिनिधी – तालुक्यातील ज्योतिदेवी गौ सेवा आश्रम गोशाळेच्या वतीने ‘गो सन्मान’ अभियानानिमित्त सोमवारी धरणगाव तहसील कार्यालयात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी समाजाचा व शासनाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा, या प्रमुख उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे.
गोसेवकांचा सक्रिय सहभाग
धरणगाव येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गो सेवक जीवनसिंह बायस, प्रा.डी.आर.पाटील, ऍड.वसंतराव भोलाणे, ऍड.संदिप पाटील, नगरसेवक सुनील चौधरी, गो रक्षक प्रथमेश सुर्यवंशी, बालू महाजन, अक्षय मुथा, राजू ओसवाल, ह.भ.प.मेघनाथ ठाकरे, श्रीपाद पांडे, विश्वास बसत, आकाश तिवारी, विनोद जैन, शैलेश ओसवाल, प्रमोद चौधरी, यशवंत महाजन, भोला महाजन, शाम भाटिया, यांच्यासह मोठ्या संख्येने गोप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोशाळेच्या कार्याची माहिती देत, गोवंशाच्या रक्षणासाठी स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे आणि गोसेवेला व्यापक स्वरूप मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
काय आहे ‘गो सन्मान’ अभियान?
भारतीय संस्कृतीत गाईला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भटक्या गोवंशाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. ज्योति देवी गौ सेवा आश्रम गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आणि निराधार गाईंची सेवा करत असून, या अभियानाद्वारे लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘गोसेवा हा केवळ धार्मिक विषय नसून तो आपल्या पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने गो संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे,’ असे मत यावेळी जीवन सिंह बायस यांनी व्यक्त केले.
निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार रेवना कांबळे यांनी या विषयावर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी धरणगाव परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि समर्पित गो सेवक उपस्थित होते.





