वराड, ता. धरणगाव, दिलीप पाटील/वार्ताहर – एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात स्वयंपाक करत असताना अचानक नागिणीने चावा घेतल्यामुळे एका चाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पिंप्री बुद्रुक परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वयंपाक करत असताना घडली काळाची झडप
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री बुद्रुक येथील रहिवासी व प्रगतिशील शेतकरी शांताराम कौतिक पाटील यांच्या सून सौ. मनीषा सुरेश पाटील (वय ४०) या बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरात नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होत्या. याच वेळेस अचानक एका नागिणीने त्यांच्या पाठीमागील बाजूस कमरेजवळ कडकडून चावा घेतला. “मला पाठीला काहीतरी चावले आहे,” असे मनीषा यांनी लागलीच घरातील सदस्यांना सांगितले.
रुग्णालयात नेत असतानाच वाटेत मृत्यूने गाठले
घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दुचाकीवरून स्थानिक डॉक्टरांकडे नेले. तेथे प्राथमिक तपासणी व उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी तात्काळ जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रिक्षामधून जळगावकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र, पिंप्री पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जात नाही तोच मनीषा यांची प्रकृती कमालीची खालावली आणि दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरात आढळून आली नागीण
या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांनी मनीषा पाटील यांच्या घराची कसून तपासणी केली असता, घरात लपून बसलेली तीच विषारी नागीण आढळून आली. सर्पमित्राने तिला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले असले, तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
गुरूवारी होणार अंत्यसंस्कार
मृत सौ. मनीषा पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी आणि सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पिंप्री बुद्रुक येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून, तेथेच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





