धरणगाव (प्रतिनिधी) – येथील सकल हिंदू समाज आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास व प्रभात फेरीची सांगता मोठ्या उत्साहात होत आहे. या सांगता समारंभाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी भव्य ‘काल्याचे कीर्तन’ आणि ‘महाप्रसाद’चे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा धरणगावातील लहान माळी वाडा पंच भवन जवळ येथे संपन्न होणार आहे.
प्रख्यात कीर्तनकार सुकदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन
या सांगता समारंभाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सुकदेव महाराज शास्त्री (भवरखेडेकर) हे असणार आहेत. त्यांच्या रसाळ वाणीतून सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत ‘काल्याचे कीर्तन’ संपन्न होईल.
गुणी जनांची संगीत साथ
या कीर्तन सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांची साथ लाभणार आहे. यात गायनाचार्य: ह.भ.प. अनिल महाराज (धरणगाव) आणि ह.भ.प. राजेंद्र महाराज (पळसखेडे) हे आपल्या सुश्राव्य गायनाने रंगत वाढवतील. मृदुंगाचार्य ह.भ.प. भागवत महाराज (कामतवाडी) हे पखवाज साथ करतील.
कीर्तन सात संगत
श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव येथील बाल गोपाळ व साधक वृंद कीर्तनात साथ देणार आहेत.
महाप्रसादाचे आयोजन
कीर्तनाची सांगता झाल्यानंतर सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक संस्था
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन धरणगावातील विविध समाज बांधवांनी एकत्र येऊन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ यांचा समावेश आहे.
धरणगाव व परिसरातील तमाम भाविक भक्तांनी या अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





