धरणगाव, प्रतिनिधी – जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज सायंकाळी धरणगाव येथे शिवसेना शहर शाखा कार्यालय आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या कार्यालयाला धावती भेट दिली.
अमळनेर येथील दौरा आटोपून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत परतत असताना त्यांनी ही भेट घेतली. या प्रसंगी धरणगाव शिवसेना महिला आघाडी आणि महिला नगरसेविकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे धरणगाव शहरात आगमन होताच शिवसेनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात आणि तालुक्यात आगामी काळात करावयाच्या पक्ष बांधणी संदर्भात त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या सदिच्छा भेटीदरम्यान धरणगाव शहरातील व तालुक्यातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी प्रमुख, महिला नगरसेविका, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे धरणगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे यांच्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.





