धरणगाव, प्रतिनिधी – शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार धरणगाव तालुक्यासाठी स्वतंत्र ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, या समितीद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून अहवाल जिल्हा स्तरावर सादर केला जाणार आहे.
समितीची रचना आणि सदस्य
या समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी (एरंडोल भाग) स्वतः राहणार असून सदस्य सचिव म्हणून धरणगावच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
प्रशासकीय सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक (सहकारी संस्था), अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे तालुका समन्वयक आणि पशुसंवर्धन सहायक आयुक्त यांचा तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून कल्याणे खुर्द येथील सोपान नामदेव बोरसे तर सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून पाळधी बुद्रुक येथील अरुण एकनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
दरमहा होणार बैठका
शासकीय निर्णयानुसार (दि. ७ एप्रिल २०२६), या समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांची छाननी करून ती निकाली काढणे आवश्यक आहे. समितीचे सदस्य सचिव यांनी अध्यक्षांच्या मान्यतेने दरमहा बैठकीचे आयोजन करावे आणि घेतलेले निर्णय अंतिम मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावेत, असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.





