धरणगाव, प्रतिनिधी – प्रवाशांची वाढती गर्दी आणि उन्हाळा-पावसाळ्यातील प्रवासाची सोय लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने एकूण १५ स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये खानदेशातून धावणाऱ्या गाडी क्र. ०४१५६/०४१५५ उधना–सुभेदारगंज स्पेशल एक्सप्रेसचाही समावेश आहे. ही गाडी आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार असून या वाढीव फेऱ्यांचे बुकिंग १२ जुलै २०२६ पासून सर्व पीआरएस काउंटर्स आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरू करण्यात आले आहे. धरणगाव, अमळनेर आणि परिसरातील प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्ग
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाडीच्या फेऱ्यांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे, गाडी क्र. ०४१५६ उधना ते सुभेदारगंज ही गाडी दर शुक्रवारी धावते. खानदेशातील प्रवाशांसाठी ही गाडी अमळनेर येथे रात्री ८:०० वाजता आणि धरणगाव येथे रात्री ८:२५ वाजता थांबेल. या गाडीद्वारे प्रवाशांना भुसावळ, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ) तसेच पुढील मार्गावरील स्थानकांपर्यंत अत्यंत सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
गाडी क्र. ०४१५५ सुभेदारगंज ते उधना परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर मंगळवारी उधनाकडे धावते. ही गाडी धरणगाव येथे सकाळी ८:५३ वाजता आणि अमळनेर येथे सकाळी ९:१५ वाजता थांबेल.
१२ जुलैपासून आरक्षण खिडकी खुली !
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०४१५६ सह इतर सर्व विस्तारित स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांचे बुकिंग १२ जुलै २०२६ पासून रेल्वेच्या अधिकृत बुकिंग काउंटर्सवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांनी वेळेवर आपले आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे.
लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांचे आवाहन
धरणगाव, अमळनेर तसेच परिसरातील नागरिकांनी या विशेष रेल्वे सेवेचा आणि मुदतवाढीचा मोठ्या संख्येने आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देशच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, झेडआरयुसीसी सदस्य प्रतीक जैन तसेच खान्देशातील विविध प्रवासी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.





