धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील संजय नगर परिसरात आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धडक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्थानिक नगरसेविका सौ.भारती महाजन यांच्या पुढाकाराने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील काटेरी झाडे, झुडपे आणि वाढलेले गवत हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
सोनवद रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे व गवत वाढले होते. यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या समस्येबाबत संजय नगर परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ.भारती महाजन यांच्याकडे तक्रार केली होती.
नागरिकांच्या या समस्येची तत्परतेने दखल घेत नगरसेविका सौ.महाजन यांनी जेसीबी यंत्राची व्यवस्था करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली. आगामी नवरात्र उत्सवाच्या काळात परिसरात महिला, नागरिक व भाविकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रस्ता रुंद व स्वच्छ झाल्याने आता नागरिकांना सुरक्षित व मोकळ्या वातावरणात ये-जा करता येणार आहे.
या स्वच्छता मोहिमे दरम्यान युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, गोलू चौधरी, गोपाल माळी, सागर महाजन, राम महाजन, मुन्ना पैलवान, पिंटू महाजन, सोपान महाजन, बापू मराठे यांच्यासह प्रभाग क्रमांक २ मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन सणाच्या तोंडावर परिसर स्वच्छ झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून नगरसेविका सौ. भारती महाजन यांचे मनापासून आभार मानले.
‘नवरात्रोत्सवाच्या काळात शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आणि माझे प्रशासन सातत्याने कटिबद्ध राहू.’
— सौ.भारती महाजन, नगरसेविका, प्रभाग क्र. २





