पारोळा, प्रतिनिधी – येथील राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी ही रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठविली आहे. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे स्मरण करत भावसार सरांनी ही मदत दिली.
सदानंद भावसार हे सामाजिक बांधिलकी जपणारे आणि विविध सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. गोरगरीब, गरजू व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांना मदत करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या काळात राज्य व राष्ट्राच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी आर्थिक योगदान दिले आहे. दुष्काळामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची जाणीव ठेवून भावसार सरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. ‘शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,’ या भावनेतून त्यांनी ही मदत केल्याचे सांगण्यात आले.
भावसार सरांच्या सामाजिक दातृत्वाची परंपरा यापूर्वीही कायम राहिली आहे. आजपर्यंत त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीस तब्बल २ लाख ६ हजार रुपये, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ७२ हजार रुपयांची मदत केली आहे. यामध्ये आता दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या २१ हजार रुपयांच्या योगदानाची भर पडली आहे. म्हणजेच विविध सहाय्यता निधींसाठी त्यांनी आतापर्यंत एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचे योगदान दिले आहे.
शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या भावसारसरांच्या या उपक्रमाचे पारोळा शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून, त्यांच्या दातृत्वाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. संकटग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल आदर्श शिक्षक भावसार सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





