धरणगाव | प्रतिनिधी
सण-उत्सव हे आनंदाचे प्रतीक असतात, पण हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या घरात जेव्हा अठराविश्व दारिद्र्य आणि थकीत वेतनाचे सावट असते, तेव्हा सणाचा गोडवा फिका पडतो. मात्र, धरणगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाताई सुरेश चौधरी यांच्या मातृत्त्वाच्या भावनेने आणि संवेदनशीलतेने आज कष्टकऱ्यांच्या कुटुंबांचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने सुवर्णमयी झाला आहे.
दुसऱ्याच्या दुःखात धावून जावे,
माणुसकीचे नाते सदैव जपावे…
अडल्या-नडल्यांच्या मनीचा भाव ओळखून,
त्यांच्या आयुष्यात सुखाचे तोरण बांधावे…!
कामगारांचे वेतन थकलं
गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या विविध ठेकेदारांकडे काम करणाऱ्या १५ ते २० रोजंदारी मजुरांचे वेतन तांत्रिक कारणांमुळे थकले होते. गुढीपाडवा हा सण तोंडावर आलेला असताना घरात पैसा नाही, पाडवा साजरा कसा करायचा? या विवंचनेत हे मजूर होते. त्यांनी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे आपली व्यथा मांडली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे तात्काळ मार्ग निघणे कठीण दिसत होते.
आईचा शब्द आणि मुलाची तत्परता
सायंकाळी जेव्हा ही बाब नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांना समजली, तेव्हा त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या. “कामगारांच्या घरात अंधार असताना आपण पाडवा कसा साजरा करणार?” हा माणुसकीचा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यांनी आपला मुलगा निलेश चौधरी यांना तातडीने बोलावून घेतले आणि “काहीही करा, पण या कष्टकऱ्यांचा पाडवा गोड झालाच पाहिजे” असा मायेचा आदेश दिला. आईचा शब्द शिरोधार्य मानून निलेशजींनी तातडीने हलचाली केल्या आणि एका महिन्याच्या वेतनाची व्यवस्था केली.
रात्री उशिरा मजुरांच्या घरी पोहचली ‘आनंदयात्री’
रात्री उशिरा सर्व मजुरांना घरी बोलावून लिलाताईंच्या हस्ते त्यांचे एक महिन्याचे मानधन सुपूर्द करण्यात आले. केवळ पैसे देऊन त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी प्रत्येक मजुराची आस्थेवाईकपणे चौकशी केली. “मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना चांगले शिकवा,” अशी प्रेमळ ताकीदही त्यांनी दिली.
लोकप्रियतेपेक्षा माणुसकी मोठी…!
लिलाताईंचे पती सुरेशनाना चौधरी मोठे उद्योगपती आहेत, तर मुलगा निलेश माजी नगराध्यक्ष आहे. घराण्यात सत्ता आणि संपत्ती असूनही लिलाताईंच्या वागण्यात कोणताही बडेजाव नाही. त्यांच्या याच ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’चा प्रत्यय आज धरणगावकरांना पुन्हा एकदा आला.
सत्तेचा बडेजाव नाही, ना पदाचा थाट,
गरिबांच्या सेवेची धरली त्यांनी वाट…
लिलाताईंच्या मायेने ओसंडले प्रेम,
कष्टकऱ्यांच्या जीवनात फुलली आनंदाची पहाट!
आपले हक्काचे पैसे हातात पडताच अनेक मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. “आज ताईंच्या रूपात साक्षात माऊली धावून आली, म्हणूनच आमचा पाडवा गोड झाला,” अशी भावना एका कामगाराने व्यक्त केली. धरणगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लिलाताईंच्या या संवेदनशील कृतीचे मोठे कौतुक होत आहे.





