धरणगाव, प्रतिनिधी – येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सामूहिक राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसिलदार सी.बी.देवराज यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव तालुक्यातील १० बीएलओ, पर्यवेक्षक, कर्मचारी यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार देण्यात आला. यात धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल शाळेचे उपशिक्षक पी.डी.पाटील यांना तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पी.डी.पाटील यांनी धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील मतदार यादी अद्यावत ठेवणे, फॉर्म नंबर सहा, सात, आठ वेळोवेळी भरणे. वर्षभरामध्ये मतदान जनजागृती व विविध कार्यक्रम राबविणे या कार्याची दखल घेऊन पी.डी.पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील पी.डी.पाटील यांना तीन वेळा आदर्श बीएलओ पुरस्कार मिळालेला आहे. याप्रसंगी तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, तहसिलचे कर्मचारी बंधू-भगिनी, तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.





