बारामती – तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील गोजुबावी गावाच्या हद्दीत ‘रेडबर्ड’ या खासगी कंपनीचे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने वैमानिक सुरक्षित असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या विमानाचा अपघात याच परिसरात झाला होता, त्यामुळे या भागाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीच्या या विमानाने बारामती विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने विमान गोजुबावी गावातील शेतात कोसळले. विमानाचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रशासन घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान नेमके कशामुळे कोसळले, याचे तांत्रिक कारण अद्याप अस्पष्ट असून नागरी विमान वाहतूक संचालनालय कडून या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.





