धरणगाव, प्रतिनिधी – येथील बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘शिवकमल जलसेवा’ या भव्य वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्व. कमलाबाई शिवराजजी कोठारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोठारी परिवारातर्फे वाॅटर कुलर देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील भूषविणार आहेत. त्यांच्याच हस्ते या जलसेवेचे विधिवत लोकार्पण करण्यात येईल. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी धरणगावच्या नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई महाजन, विभाग नियंत्रक प्रद्रनेश बोरसे, अर्बन बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, उद्योजक जीवन (आप्पा) बयस आणि एरंडोल आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रवाशांसाठी दिलासादायक उपक्रम
धरणगाव बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी मिळावे या सामाजिक भावनेतून महेंद्र शिवराजजी कोठारी (DRUCC सदस्य, पश्चिम रेल्वे) आणि रितेश महेंद्र कोठारी (पुणे) यांनी या वॉटर कुलरची व्यवस्था केली आहे. या उपक्रमासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या लोकार्पण सोहळ्याला धरणगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक महेंद्र कोठारी आणि कोठारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.





