नवी दिल्ली, दि. २५, वृत्तसंस्था – गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात गाजत असलेल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या वादामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला असून पंतप्रधानांनी तो स्वीकारल्याचे समजते.
देशव्यापी आंदोलनाला यश
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ या राजकीय पक्षाकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र निदर्शने सुरू होती. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती. या देशव्यापी दबावानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना आपले पद सोडावे लागले आहे.
’विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर कचाट्यात अडकू नये म्हणून निर्णय’
राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “देशविरोधी शक्तींनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये आणि कोणत्याही एका विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मुलांनी आपला वेळ अभ्यासावर आणि करिअर वर केंद्रित करावा, हे ध्यानात ठेवून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.”
राजकीय घडामोडींना वेग
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार आणि भाजप वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, केंद्रीय मंत्रिमंडळात आता नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, परीक्षा नियंत्रक संस्था असलेल्या ‘एनटीए’च्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू असून, आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याला विद्यार्थ्यांचा आणि लोकशाहीचा मोठा विजय म्हटले आहे.





