धरणगाव, प्रतिनिधी – होमगार्ड पथकातील कर्तव्यदक्ष जवान सुरेश झगा महाजन हे तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी धरणगाव येथील प.रा.विद्यालयात भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तालुक्यातील अनेक होमगार्ड आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला होमगार्ड तालुका समादेशक ईश्वर महाजन यांनी सुरेश महाजन यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निष्कलंक सेवेबद्दल गुणगौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुरेश महाजन हे १९९८ मध्ये होमगार्ड संघटनेत रुजू झाले. त्यांनी २८ वर्षे अविरतपणे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. धरणगावातील त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकांचे डोळे भरून आले.
या सोहळ्यात धरणगाव पथकातील पलटण नायक ईश्वर पाटील, अं. लिपिक जानकीराम पाटील, तसेच अनेक होमगार्ड जवान उपस्थित होते. यामध्ये अनिल सातपुते, भिकन लोहार, आत्माराम चौधरी, रमाकांत बाविस्कर, पुरुषोत्तम वाणी, हर्षल सावंत, भगवान महाजन, सुदर्शन पाटील यांचा समावेश होता. सुरेश महाजन यांचे नातेवाईक प्रल्हाद महाजन आणि माजी पलटण नायक अशोक देशमुख यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.





