जळगाव, प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या ‘गृह उपयोगी संच’ योजनेच्या लाभार्थ्यांकडून केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली १०० रुपयांची लाच मागणाऱ्या आणि स्विकारणाऱ्या एका महिला कर्मचारीला रंगेहाथ पकडण्यात आले.
जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. आरोपी आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजी नगर, जळगाव) यांना सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्या टेबलाखालच्या पत्र्याच्या पेटीतून ४१,२५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम इतर लाभार्थ्यांकडून लाच म्हणून घेतलेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जळगाव येथील रहिवासी तक्रारदार यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत गृह उपयोगी संच मिळवण्यासाठी ९ एप्रिल २०२६ रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार १५ एप्रिल रोजी चिंचोली (ता. जळगाव) येथील वाटप केंद्रावर हजर राहण्याचे पत्र आले. तक्रारदार केंद्रावर गेल्यावर त्यांना प्रथम तब्बसुम शेख यांची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी आरोपी आसमा शेख यांच्याकडे पाठवले. आसमा शेख यांनी तक्रारदारांना सांगितले, “गृह संच ताब्यात देण्यासाठी तुमची केवायसी करावी लागेल, त्यासाठी १०० रुपये द्या.” असे म्हणत त्यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी तत्काळ ला.प्र.वि. जळगावकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी ला.प्र.वि.च्या पथकाने सापळा रचला. आरोपीने पंचांसमक्ष तक्रारदारांकडून १०० रुपये लाच स्वीकारली. सापळा यशस्वी झाल्यावर आरोपीच्या टेबलाखालच्या पत्र्याच्या पेटीतून ४१,२५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम विविध लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली घेतलेली लाच असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा चंद्रकांत अवतारे यांनी काम पाहिले. सापळा पथकात उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोहेकॉ बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसने, प्रदिप पोल यांचा समावेश होता. तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नकशे यांनी काम पाहिले.




