जळगाव, प्रतिनिधी – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचाली वाढल्या आहेत. ग्रामपंचायत प्रभागनिहाय सदस्यांच्या आरक्षण सोडतीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा असणारा ‘नमुना-ब’ अखेर काल, शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रसिद्धीमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
२५ जूनपर्यंत घेता येणार आक्षेप
प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘नमुना-ब’ मधील आरक्षणावर जर कोणाला काही आक्षेप किंवा हरकत असेल, तर त्यासाठी १९ जून ते २५ जून २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या मुदतीत नागरिक आणि राजकीय पक्षांना आपले लेखी आक्षेप प्रशासनाकडे नोंदवता येतील.
मिळालेल्या सर्व आक्षेपांची आणि हरकतींची रीतसर दखल घेऊन, त्यावर योग्य तो विचार केला जाईल. त्यानंतर १० जुलै २०२६ रोजी अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
टप्पातारीख / कालावधी
नमुना-ब प्रसिद्धी – १९ जून २०२६
आक्षेप व हरकती – १९ जून ते २५ जून
अंतिम प्रसिद्धी – १० जुलै
प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम आरक्षणानंतर मतदार यादी जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होवून ऑक्टोबर महिन्यात निवडणूकांची घोषणा करण्यात येवू शकते.
सरपंच आरक्षण यापूर्वीच निश्चित!
या प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न होते. वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे निरसन करताना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच म्हणजेच जुलै २०२५ मध्ये घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण निश्चित केले जात आहे.
ऑक्टोबरनंतर निवडणुकांचा धुराळा!
१० जुलै रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील टप्प्यात सर्व ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदारयाद्यांची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ऑक्टोबर २०२६ नंतर कोणत्याही क्षणी ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
आरक्षण सोडतीबाबत काही तक्रार असल्यास २५ जूनपूर्वी आपल्या तालुका/जिल्हा प्रशासकीय कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




