जळगाव, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारची व्याज आकारणी करू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने कडक पावले उचलली असून, नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना संबंधित बँकेविरुद्ध तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सरपंच सुरेश पाटील यांच्या लढ्याला यश
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी बँकेच्या या मनमानी कारभाराविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या लुटी विरुद्ध शासनाकडे सातत्याने तक्रारी करत तीव्र पाठपुरावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत शासनाने संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला होता. त्यानंतर अखेर आज शासनाने बँकेवर कारवाईचे थेट आदेश जारी केले.
काय आहे मुख्य प्रकरण?
शासनाने ११ जून २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, शासनाचा मूळ आदेश (१३ मार्च २०१८) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या निकषांनुसार जे शेतकरी पात्र ठरले आहेत, त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
बँकेकडून उल्लंघन
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत पात्र शेतकऱ्यांकडून ‘निमबाह्य येणे व्याज’ बेकायदेशीरपणे वसूल केले.
गुलाबराव देवकर यांच्यावरील आरोपांचीही चौकशी सुरू
याच तक्रारीच्या अनुषंगाने, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी देखील सुरू आहे. हे प्रकरण सध्या शासन स्तरावर न्यायप्रविष्ट असल्याचे शासनाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाचे कडक निर्देश
शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाची गंभीर दखल घेत, शासनाने आता विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने शासनास सादर करण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकार वर्तुळाचे लक्ष आता पुढील कायदेशीर कारवाईकडे लागले आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील
या यशस्वी पाठपुराव्याबाबत बोलताना झुरखेडा गावचे सरपंच सुरेश पाटील यांनी शासनाचा स्पष्ट नियम असतानाही बँकेने गरीब शेतकऱ्यांकडून नियमबाह्य व्याज वसूल केले. हा शेतकऱ्यांवर अन्याय होता. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळून न्याय मिळावा, यासाठी मी सातत्याने लढा दिला. शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सत्याचा विजय होईल असा मला विश्वास असल्याचे म्हटले आहे.





