धरणगाव (रवींद्र महाजन/प्रतिनिधी) – तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा डी.आर.यू.सी.सी. सदस्य महेंद्र कोठारी यांनी नुकतीच मुंबई येथे पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक रामाश्रय पांडे यांची भेट घेतली. या भेटीत विशेषतः प्रलंबित असलेली उधना–पुणे स्पेशल ट्रेन तातडीने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी ‘अमृत भारत’ रेकचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याचे आश्वासन महाप्रबंधकांनी दिले आहे.
लोको रिव्हर्सलचा अडथळा होणार दूर
गेल्या अनेक दिवसांपासून उधना–पुणे स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव सेंट्रल रेल्वेकडे प्रलंबित आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर इंजिनची दिशा बदलण्याच्या तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेकडून या गाडीला मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महेंद्र कोठारी यांनी ही ट्रेन ‘अमृत भारत’ रेकसह (ज्याला दोन्ही बाजूंनी इंजिन असते) चालवण्याची विनंती केली. यामुळे जळगावला इंजिन बदलण्याची गरज उरणार नाही. मध्य रेल्वेचे सी.पी.टी.एम. डॉ. मिलिंद हिरवे यांनीदेखील अमृत भारत रॅक मिळाल्यास या ट्रेनला मंजुरी देण्याची तयारी दर्शविली असल्याचे महाप्रबंधकांच्या निदर्शनास आणून दिले. महाप्रबंधक पांडे यांनी हा विषय गांभीर्याने घेत तात्काळ रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठवण्याचे मान्य केले.
ओखा-तिरुपतीला धरणगाव तर मेमूला भोणे येथे थांब्याची मागणी
चर्चेदरम्यान कोठारी यांनी प्रवाशांच्या इतरही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. ओखा–तिरुपती एक्सप्रेस (१९५५९/६०) ही नवीन नियमित गाडी धरणगाव स्थानकावरून जाते. मात्र, तिला येथे थांबा नाही. भाविकांची सोय व्हावी यासाठी धरणगाव येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली. उधना-भुसावळ मेमू (१९१०५/०६): या गाडीला भोणे स्थानकावर थांबा मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होईल, असे पटवून देण्यात आले.
धरणगाव स्थानकावरील पाणी प्रश्न सुटणार
महेंद्र कोठारी यांनी सिनियर विभागीय परिचालन व्यवस्थापक अरुणकुमार मीना यांचीही भेट घेतली. धरणगाव स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येवर त्यांनी लक्ष वेधले. यावर श्री. मीना यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आदेश देऊन ही समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.
या यशस्वी भेटीमुळे धरणगाव परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या भेटीप्रसंगी रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.





