पुणे, ६, प्रतिनिधी – काँग्रेसचे माजी खासदार, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आणि २०१० दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समिती प्रमुख सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे आज सकाळी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. दीर्घ आजाराने ते ग्रस्त होते.
कलमाडी यांनी पुण्यातून अनेक वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. भारतीय क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते, मात्र २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचार आरोपांमुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
त्यांच्या निधनाने राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री, काँग्रेस नेते आणि ऑलिम्पिक संघटनेकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.





