धरणगाव, प्रतिनिधी – शेगाव तालुक्यातील हिंगणा येथील नवनाथ मंदिरातील पवित्र नवनाथ मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी धरणगाव येथील नाथ भक्तांनी केली आहे. याबाबत धरणगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले.
नाथ मंदिरातील विटंबनेची घटना भारतीय संविधानातील अनुच्छेद २५, २६, २९ व ५१- अ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कठोर गुन्हा असल्याचे स्पष्ट करून तात्काळ व परिणामकारक कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोळपिंप्री येथील श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रमाचे अध्यक्ष दिनेश जिजाबराव काटे यांच्या वतीने तसेच अनेक नाथभक्तांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. हिंगणा येथील नवनाथ मंदिर परिसरात दिनांक २७ व २८ जानेवारी दरम्यान अज्ञात समाजविघातक, द्वेषप्रेरित व कटकारस्थानी व्यक्तींनी अनधिकृत, बेकायदेशीर व गुन्हेगारी हेतूने प्रवेश करून, नवनाथ संप्रदायातील अत्यंत पवित्र, ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या पूजनीय असलेल्या मच्छिन्द्रनाथ, गोरखनाथ, कानिफनाथ, जालिंद्रनाथ, भ्रातरीनाथ, निवृत्तीनाथ, रेवणनाथ, गहिनीनाथ व चरपटीनाथ यांच्या पवित्र मूर्तीची विटंबना व तोडफोड केली.
ही घटना केवळ मालमत्तेच्या नुकसानीपुरती मर्यादित नसून नवनाथ संप्रदायाच्या श्रद्धा, आध्यात्मिक परंपरा व लाखो भक्तांच्या धार्मिक भावनांवर केलेला आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला असला तरी या घटनेची उच्चस्तरीय, चौकशी करण्यात यावी. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांची त्वरित ओळख पटवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या धार्मिक विटंबना व समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्यात यावी, सात दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्याची मागणी असलेले निवेदन धरणगावचे निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांना नाथभक्तांचे गुरुवर्य प.पू. बालकनाथ महाराज यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी सुभाष पाटील, मुरलीधर पाटील, दिलीप पाटील, गणेश सोननी, संतोष महाजन, नरेंद्र (पप्पू) महाजन, विनोद पाटील, मनिष चौधरी, योगेश महाजन, कैलास मराठे, जगन्नाथ भोई, प्रदीप चौधरी, वासुदेव माळी, जितेंद्र पाटील (महाराज), शाम पाटील, देविदास पाटील, गजानन सोनवणे, हितेश धनगर, अंकुश चव्हाण, ललित महाजन, हेमंत महाजन, अविनाश चौधरी, आनंद पाटील (पहेलवान), गणेश निकम, दिपक महाजन, पवन मराठे, दयाराम महाजन, रविंद्र पाटील, कृष्णा महाजन, गणेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, आकाश कुंवर, दिनेश पाटील, मोहीत पवार, लक्ष्मणराव पाटील, परशुराम पाटील, पंकज महाले, जयेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद श्रीराम, समाधान महाजन, यशोदीप सोनवणे आदी धरणगाव तालुका व शहरातील नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपीला कठोर शासन झालंच पाहिजे या मागणीसाठी नाथभक्तांनी दिलेल्या घोषणांनी तहसिल व पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून निघाला.





