धरणगाव, प्रतिनिधी – भारतीय रेल्वेच्या अम्ब्रेला वर्क 2024–25 अंतर्गत पश्चिम रेल्वेवर ‘कवच’ ट्रेन टक्कर प्रतिबंधक प्रणाली अंमलात आणण्यासाठी दोन कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 483.65 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.
या 483.65 कोटींच्या खर्चात तापी विभागातील उधना–जळगाव या 307 किलोमीटर रेल्वे मार्गावर ‘कवच’ ही दोन रेल्वे गाड्यांची टक्कर प्रतिबंधक प्रणाली बसविण्यासाठी 109.83 कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे रेल्वे गाड्यांच्या परिचालन सुरक्षेत लक्षणीय वाढ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या 436 इंजिनांमध्ये सुधारणा, उन्नयन व प्रोग्रामिंगसाठी 373.82 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. ही दोन्ही कामे भारतीय रेल्वेच्या व्यापक अम्ब्रेला प्रकल्पाचा भाग आहेत. या अम्ब्रेला प्रकल्पाअंतर्गत पश्चिम रेल्वेसाठी 2,800 कोटींची उप-अम्ब्रेला तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
या प्रस्तावित उपक्रमांमुळे भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल तसेच आधुनिक सुरक्षा प्रणालींच्या जलद अंमलबजावणीबाबतची भारतीय रेल्वेची कटिबद्धता स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वचे झेडआरयुसीसी सदस्य आणि खान्देश प्रवासी असोसिएशनचे प्रतिक जैन यांनी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टी कौतुक करून खान्देशातील प्रवाशांच्यावतीने प्रतिक जैन यांनी आभार मानले.





