धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील माँसाहेब जिजाऊ महिला पतसंस्थेतर्फे नारी शक्तीचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. वाणी मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कारासह हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या संचालिका शोभाताई चौधरी व ह.भ.प. विद्याताई येवले, लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई महाजन यांच्यासह माँसाहेब जिजाऊ पतसंस्थेच्या चेअरमन योगिता वाणी, व्हाईस चेअरमन चंद्रकला भोलाणे व सर्व संचालिका उपस्थित होत्या.
चेअरमन योगिता वाणी यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे उद्दिष्ट हे महिला सबलीकरण व औद्योगिक, व्यवसायिक महिलांना प्रोत्साहन देणे आहे. सहा महिन्यापूर्वी स्थापना झाली असून संस्था प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. संस्थेने आतापर्यंत 70 लाखाच्या ठेवी मिळविल्या असून 50 लाखांचे कर्ज वाटप झाले आहे. संस्थेची यशस्वी वाटचाल ही सर्व महिला सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यामुळे शक्य असल्याची भावना व्हाईस चेअरमन चंद्रकलाताई मोलाचे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात धरणगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई चौधरी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई महाजन, नगरसेविका मंदाकिनी येवले, अंजली विसावे, हेमांगी अग्निहोत्री, सोनाली कंखरे, मीना चौधरी, प्रमिला शिरसाठ, ज्योती पाटील, अक्काबाई चव्हाण, कविता पाटील, रुपाली महाजन या नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना नवनिर्वाचित नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनी आपल्या महिलांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष शोभाताई चौधरी यांनी आपल्या मनोगतातुन महिलानी आपल्या मुलांना शिक्षणासोबत संस्कार सुद्धा देण्याची गरज असल्याचे सांगितले. अंजली विसावे, सभासद मोरे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
पतसंस्थेचे मॅनेजर प्राज्वल सोनार यांनी ‘छोटी बचत उद्याचं भविष्य’ माध्यमातून संस्थेने 5 वर्षासाठी सुरू केलेल्या योजनेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या पिग्मी एजंट गिरिजा वाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालिका शितल केले, अनिता मेहेर, डिंपल चौधरी, स्वाती महाजन, वैशाली सोनार, मनीषा पाटील, सोनाली कंखरे, कु. निर्मला पवार, पिग्मी एजंट देवश्री महाजन, शिपाई मीना कोतकर यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ.निधी अमृतकर यांनी मानले.





