धरणगाव, प्रतिनिधी – येथील नामांकित ‘धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी’वर कब्जा मिळवण्यासाठी रचलेला बनावट कागदपत्रे आणि खोट्या शिक्क्यांचा कुटील डाव धर्मादाय उपायुक्तांनी उधळून लावला लावल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष अलिम शिरपूरकर आणि सचिव एजाज खान यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. संस्थेचे साधे सभासद नसतांनाही खोटे फेरफार अर्ज दाखल करणाऱ्या मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी यांना मोठा दणका देत, धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी हा बनावट अर्ज फेटाळून लावल्याचे अंतरिम अलिम शिरपूरकर आणि आणि एजाज खान यांनी पत्रकात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काझी यांनी संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या नावाचे बनावट शिक्के तयार केले होते. या खोट्या शिक्क्यांच्या आधारे त्यांनी संस्थेवर आपला अधिकार सांगण्यासाठी धर्मादाय उपायुक्त कार्यालय, जळगाव येथे फेरफार अर्ज क्र. १०२/२०१५ दाखल केला होता. विशेष म्हणजे, मोहम्मद नईम हे या संस्थेचे साधे ‘सर्वसाधारण सभासद’ देखील नसतांना त्यांनी हे धाडस केले होते. संस्थेची सत्ता बेकायदेशीररीत्या काबीज करण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण बनावटगिरीचा खेळ मांडण्यात आला होता असा दावा संस्थेचे अध्यक्ष अलिम शिरपूरकर आणि सचिव एजाज खान यांनी पत्रकात केला आहे.
तत्कालीन उपाध्यक्षांची ‘एन्ट्री’ आणि कायदेशीर लढा?
हा बनावट प्रकार लक्षात येताच धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन उपाध्यक्ष शफी अहमद भाईमिया काझी यांनी तातडीने या अर्जावर हरकत घेतली. त्यांनी कायदेशीर मार्गाने हा लढा लढण्याचा निर्धार केला. या प्रकरणी ॲड. डी. ओ. पाटील यांनी भक्कम पुराव्यांसह बाजू मांडली. मोहम्मद नईम यांनी केलेले दावे हे पुराव्यांच्या आधारे कसे खोटे आहेत आणि शिक्के बनावट कसे आहेत, हे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर धर्मादाय उपायुक्तांनी हा बनावट अर्ज फेटाळून लावत सत्य समोर आणल्याचा दावा श्री.शिरपूरकर आणि श्री. खान यांनी केला आहे.
संशयितांवर फौजदारी गुन्ह्यांचा विळखा
केवळ फेरफार अर्ज नामंजूर झाला असे नाही, तर खोटे शिक्के बनवणे आणि संस्थेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात मोहम्मद नईम अख्तर यांच्यासह इतर ५ जणांवर धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ४१७, ४६५, ४६८, ४७१ (बनावटगिरी आणि फसवणूक), तसेच १४३, १४७, ४४८, १८६, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हे नोंदवण्यात आल्याचा दावा ही शिरपूरकर आणि खान यांनी केला आहे.
शिक्षण संस्थेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे बनावटगिरी करून संस्था हडपण्याचे प्रयत्न झाल्याने धरणगाव शहरात संताप व्यक्त केला जात असून धर्मादाय उपायुक्तांच्या या निकालामुळे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असून, खऱ्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे अध्यक्ष अलिम शिरपूरकर आणि सचिव एजाज खान यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.





