धरणगाव, रवींद्र महाजन – राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या द्विशताब्दी वर्षानिमित आणि धरणगाव येथील निसर्गप्रेमी महेंद्र तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० वृक्षांचे रोपण आणि २०० ग्रंथांचे वाटप करण्यात आले. सर्मपण बहुउद्देशीय संस्था व चिंतामणी मोरया नगर मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
सर्मपण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना महेंद्र तायडे यांनी केली आहे. वाढदिवस साजरा करताना केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, महागडे डिजीटल बॅनर्स आणि पार्ट्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत आहे. महेंद्र तायडे यांनी याला फाटा देत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. आनंदोत्सव साजरा करतांना मोरया नगरातील दिवंगत मित्र ॲड. विवेक पाटील, देवेंद्र पाटील, देविदास पाटील, दिनेश शिरसाठ आणि चेतन ठाकरे यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी धरणगाव परिसरात २०० पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प महेंद्र तायडे यांनी करून तो प्रत्यक्षात साकारला सुध्दा.
पर्यावरण आणि विचारांची अनोखी सांगड
केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर समाजात संत, समाजसुधारक व महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने २०० प्रेरणादायी ग्रंथांचे वाटप करून सामाजिक प्रबोधनाचा संदेशही यावेळी देण्यात आला. या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब, बेल, आंबा, अशोक, जांभूळ, अर्जुन यांसारख्या दीर्घायुषी आणि अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच ग्रंथ भेट देण्याच्या या कल्पनेमुळे पर्यावरण संवर्धन आणि वैचारिक समृद्धी या दोन्हींचा सुंदर संगम येथे पाहायला मिळाला.
भविष्यासाठी हिरवागार वारसा – महेंद्र तायडे
’कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याची वेदनादायी परिस्थिती आपण सर्वांनी अनुभवली आहे. त्यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित झाली,’ अशी भावना महेंद्र तायडे यांनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, ‘वृक्ष हे मानवजीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. ते कोणतीही अपेक्षा न ठेवता मानवाला प्राणवायू, सावली, अन्न आणि पर्यावरणाचा समतोल देतात. प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांशी जोडले, तर समाजात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडू शकते. पुढील पाच वर्षांत दोन हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे महाकाय वृक्ष होईपर्यंत संवर्धन करण्याचा आमचा संकल्प आहे.
वाढत्या प्रदूषणावर सामाजिक उत्तर
आज वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून तापमानवाढ, पाणीटंचाई आणि प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत महेंद्र तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासह सामाजिक समतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. या उपक्रमामुळे परिसरात मोठी सामाजिक जाणीव जागृत झाली असून, अनेकांनी यापुढे आपले वाढदिवस अशाच प्रकारे सामाजिक कार्यातून साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मित्रांचा मोठा राबता
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ललित मराठे, दीपक सूर्यवंशी, किशोर खैरनार, गणेश मराठे, चेतन सोनवणे, सागर ठाकरे, भूषण पाटील, आकाश साठे, आकाश बिवाल, मनोज गुजर, रमेश माळी, विजय सोनवणे, सुजल वाणी, अनंत धारणे, विजय महाजन, श्याम अहिरे, मयूर भामरे, संतोष सोनवणे, मुकेश लोहार, भरत शिरसाठ, गणेश गुरव, राजू कुंभार, राधे चौधरी, दीपक माळी, अमोल सूर्यवंशी, तेजस पाटील, नंदा महाजन, बाळासाहेब जाधव, साई पवार, बंटी महाजन, दिव्येश मराठे, बापू मोरे, समाधान मराठे, धीरू अहिरे, राज पवार, यश पाटील, लक्ष्मीकांत पित्रोडा, सोहम पाटील, हेमंत माळी, पी.डी. पाटील, गोरख देशमुख, नगर मोमीन, करीम लाला, राहुल पाटील यांच्यासह मोरया नगर मित्र मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी व मित्रांनी अतोनात परिश्रम घेतले.
वाढदिवसापासून समाजकारणाकडे…!
केवळ शुभेच्छा आणि तात्पुरत्या उत्सवापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि दिवंगत मित्रांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा संदेश देणारा महेंद्र तायडे यांचा हा ४१ वा वाढदिवस सध्या धरणगाव परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. समाजासाठी एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी आदर्श म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.





