धडगाव, जि.नंदुरबार, प्रतिनिधी – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ (ता. धडगाव) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय शाळेत करण्यात आले होते. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्मरणीय ठरवा, या मुख्य उद्देशाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
या प्रसंगी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, उपसंचालक भावना राजनोर, डायट प्राचार्य दीपक साबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ढोल-ताशांचा गजर, तिरंगी फुगे अन् रिमोटने दीपप्रज्वलन
शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे शाळेत आगमन होताच लेझीम पथकाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांचे वाजतगाजत स्वागत केले. आदिवासी पेहरावातील विद्यार्थिनींनी मान्यवरांचे औक्षण केले आणि तिरंगी फुगे हवेत सोडून त्यांना प्रवेशद्वारात आणले गेले. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे, कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे आणि मुख्य दीपप्रज्वलन हे रिमोटद्वारे कळ दाबून करण्यात आले. ठीक सकाळी १०.३० वाजता शिक्षणमंत्री आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेची प्रातिनिधिक घंटा वाजवून राज्यातील सर्व शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला.
हायलाइट्स: कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम
मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शालेय आवारात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
शैक्षणिक स्टॉल्स व सेल्फी पॉईंट
शाळेत उभारण्यात आलेल्या शैक्षणिक स्टॉल्सना मान्यवरांनी भेटी दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटवर मंत्र्यांसोबत फोटो काढले.
स्पोर्ट्स ड्रेसचे वितरण
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले.
भोजनाची गोड सुरुवात
पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांना आंब्याचा रस, पुरणपोळी, भात व आमटीचे भोजन देऊन शालेय वर्षाची गोड सुरुवात करण्यात आली.
‘विद्यार्थी हेच आपले दैवत’ – शिक्षणमंत्री
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, ‘राज्यातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय हे इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण देणारे राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यालय आहे.’ शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी, ‘विद्यार्थी हे आपले दैवत असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे, ही सेवा उत्कृष्टपणे निभवावी,’ असे आवाहन केले.
शिक्षकांशी थेट संवाद आणि समस्यांचे निवारण
मुख्य कार्यक्रमानंतर मंत्री महोदयांनी शाळेतील शिक्षक आणि शासनाच्या ‘आयडॉल’ उपक्रमातून निवड झालेल्या जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांशी थेट संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली आणि शिक्षकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी मानले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. युनूस पठाण, मुख्याध्यापक राजाराम वळवी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री अशा दुर्गम भागातील शाळेच्या प्रवेशोत्सवासाठी स्वतः उपस्थित राहिले आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. या भागातील शाळांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे.’
— आमदार आमश्या पाडवी





