धरणगाव, प्रतिनिधी – गावांचा विकास हीच खरी सेवा आहे, हे केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवत धरणगाव तालुक्यातील सोनवद खु, अहिरे बु, सोनवद बु, चमगाव व बाभूळगाव या पाच गावांत कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज पार पडले. तालुक्यात सुरू असलेला विकासाचा झंझावात या कार्यक्रमातून ठळकपणे दिसून आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रस्ते, शाळा, आरोग्य, ग्रामपंचायत इमारती, शेतरस्ते आणि मूलभूत सुविधा मजबूत केल्याशिवाय गावांचा खरा विकास होऊ शकत नाही. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच आम्हाला अधिक काम करण्याची प्रेरणा देते. येणाऱ्या काळातही धरणगाव तालुक्याच्या विकासात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
भूमिपूजन व उद्घाटन कामे
भूमीपूजन कामे : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चमगाव ते वाकटुकी या ५ किमी रस्त्याचे दर्जोन्नती करून खडीकरण व डांबरीकरण; यात १० ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच ८६० मीटरचे काँक्रीटीकरण होणार आहे (८ कोटी ५० लक्ष).
बाभुळगाव ते भामर्डी २.५ किमी लांबीचा शेत रस्त्याचे दर्जोन्नती करून डांबरीकरण करणे – २ कोटी ५६ लक्ष. या रस्त्यांसह सोनवद खु. येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम – २० लक्ष. अहिरे बु. येथे स्मशानभूमी पोहोच रस्त्यावर आरसीसी गटार बांधकाम – २० लक्ष, शाळा वर्ग खोली बांधकाम – १३ लक्ष, स्मशानभूमीत सांत्वन शेड बांधकाम – १० लक्ष.
सोनवद बु. येथे तलाठी कार्यालय बांधकाम – ५५ लक्ष, भिल्ल वस्ती ते कुंभारवाडा कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण – २५ लक्ष. बाबुळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – २० लक्ष, तलाठी कार्यालय बांधकाम- २० लक्ष, स्मशानभूमी पोहोच रस्ता – २० लक्ष, गावअंतर्गत काँक्रिटीकरण – ३५ लक्ष. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.
उद्घाटन कामे – सोनवद बु. येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुसज्ज इमारतीचे – ३५ लक्ष, सोनवद खु. येथे संरक्षण भिंत बांधकाम – २५ लक्ष, स्मशानभूमी पोहोच रस्ता काँक्रिटीकरण – १० लक्ष, बाभुळगाव येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत हायमस्ट लॅम्प बसविणे – २० लक्ष. या कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पायातील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले.
उत्स्फूर्त स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात, महिलांच्या औक्षणाने व फटाक्यांच्या जल्लोषात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रत्येक गावात भव्य स्वागत करण्यात आले. विकास कामांमुळे जनतेत निर्माण झालेला विश्वास आणि नेतृत्वावरील प्रेम या स्वागतातून ठळकपणे व्यक्त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले, तर आभार माजी सभापती प्रेमराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे तालुका संघटक पवन पाटील व कैलास सोनवणे यांनी केले होते.
यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी पं. स. सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, मार्केटचे सभापती प्रेमराज पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पाटील, माजी तालुका प्रमुख गजानन पाटील, सोनवद, बाभूळगावं, अहिरे, चमगाव येथिल सरपंच बाळू शिरसाठ, धीरज पाटील, कृष्णा सदांशिव, पवन गजानन पाटील, भगवान सावंत यांच्यासह पोलीस पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, विस्तार अधिकारी आर. डी. इंगळे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे शाखा अभियंता विशाल पाटील, ग्रामविकास अधिकारी श्यामसुंदर पाटील, महेश सोनवणे, मंगलअण्णा पाटील, नाटेश्वर पवार, शेतकी संघ अध्यक्ष गजानन पाटील, युवासेनेचे दीपक भदाणे, तसेच संबंधित गावांचे सर्व उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, पोलीस पाटील, वि. का. सोसायटीचे सदस्य तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





