धुळे, प्रतिनिधी – शहरातील एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूलचा इयत्ता पाचवीतील प्रज्ञावंत विद्यार्थी आर्यन सुजितकुमार बाविस्कर याने नुकत्याच झालेल्या ‘एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफी २०२६’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल पारोळा येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसारसर यांनी आर्यनचा विशेष गौरव केला.
आर्यनच्या या दैदिप्यमान यशाची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, स.ध.भावसार सरांनी अत्यंत आनंद व अभिमान व्यक्त केला. त्यांनी आर्यनला आपल्या निवासस्थानी सन्मानाने आमंत्रित केले. या प्रसंगी भावसार सरांच्या हस्ते आर्यनला अभिनंदन पत्र, गौरव पत्र आणि ५०० रूपये रोख पारितोषिक देऊन कौतुकास्पद सन्मान करण्यात आला. तसेच त्याला पुढील क्रीडा वाटचाल व उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा व आशीर्वाद दिले. याप्रसंगी आर्यन बाविस्कर व त्याच्या कुटुंबीयांनी भावसार सरांचे आभार मानत त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
भावसार सरांचे उल्लेखनीय कार्य
क्रीडा, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची स. ध. भावसार सरांची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांनी आजपर्यंत तब्बल १,१०० यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा असाच यथोचित गौरव केला आहे. त्यांच्या या निरंतर उपक्रमाबद्दल खान्देशातील शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मनःपूर्वक आनंद व्यक्त करून भावसार सरांचे आभार व्यक्त केले.





