धरणगाव, प्रतिनिधी – डिजिटल इंडियाच्या युगात ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढत असतानाच, आता सायबर भामट्यांनी व्यापाऱ्यांना फसवण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. धरणगाव शहर आणि परिसरात ‘फेक गुगल पे’ (Fake GPay) ॲप्लिकेशनचा वापर करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणारी एक टोळी सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या एकच दिवसात (१६ जुलै) शहरातील २ ते ३ दुकानांमध्ये या भामट्याने हजारो रुपयांचा गंडा घातल्याने व्यापारी वर्गात तीव्र खळबळ उडाली आहे.
अशी आहे फसवणुकीची ‘मोडस ऑपेरंडी’…
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा ग्राहकाचे सोंग घेऊन दुकानात येतो. मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानंतर तो रोख पैसे देण्याऐवजी ‘गुगल पे’ने पैसे देतो असे सांगतो. त्यानंतर तो त्याच्या मोबाईलमधील एका हुबेहूब दिसणाऱ्या बनावट (Fake) ॲप्लिकेशनचा वापर करतो. पैसे ट्रान्सफर केल्यावर मोबाईल स्क्रीनवर पेमेंट ‘सक्सेसफुल’ (Successful) झाल्याचा खोटा मेसेज तो व्यापाऱ्यांना दाखवतो. व्यापारी त्याच्या मोबाईल स्क्रीनवरील मेसेज पाहून व्यवहार पूर्ण झाल्याचे समजतात. मात्र, प्रत्यक्षात व्यापाऱ्याच्या बँक खात्यात एकही रुपया जमा होत नाही. जेव्हा व्यापारी खात्यात पैसे जमा न झाल्याची विचारणा करतात, तेव्हा तो गडबडीत स्वतःची कोणतीही खरी ओळख न सांगता, उडवाउडवीची उत्तरे देऊन तिथून पळ काढतो.
ओळख लपवण्यासाठी कडेकोट ‘फिल्डिंग’
या भामट्याची फसवणूक करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध आहे. दुकानात आल्यावर आपली ओळख उघड होऊ नये म्हणून तो पूर्णपणे चेहरा व अंग झाकून येतो. त्याच्या कडे काळ्रया रंगाची होंडा युनिकॉर्न (Honda Unicorn) मोटरसायकल आहे. चेहरा लपवण्यासाठी डोक्यावर सलग हेल्मेट, हातामध्ये हँड ग्लोज (हातमोजे) आणि पायात शूज घातलेले असतात. दुकानात आल्यावरही तो हेल्मेट आणि ग्लोज काढत नाही, जेणेकरून त्याचा चेहरा किंवा हाताचे ठसे कुठे उमटणार नाहीत.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन
या भामट्याने सावध होऊ नये म्हणून सध्या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. मात्र, या भामट्याच्या सर्व संशयास्पद हालचाली आणि त्याने केलेली फसवणूक दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे धरणगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या हेल्मेटधारी भामट्याचा कसून शोध घेत आहेत.
व्यापाऱ्यांसाठी धरणगाव पोलिसांचे आवाहन
ऑनलाईन पेमेंट स्वीकारताना केवळ ग्राहकाच्या मोबाईल स्क्रीनवरील ‘सक्सेसफुल’चा मेसेज पाहू नका. जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर बँकेचा अधिकृत मेसेज येत नाही किंवा तुमच्या बँक खात्यात (किंवा बिझनेस ॲपच्या साऊंड बॉक्सवर) पैसे जमा झाल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत ग्राहकाला माल देऊ नका. असा कोणताही संशयास्पद इसम आढळल्यास तात्काळ धरणगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





