मंगळवेढा (वृत्तसंस्था): सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आणि आपल्या गावरान खाद्यसंस्कृतीच्या रिल्सने चाहत्यांना भुरळ पाडणारी २५ वर्षीय प्रसिद्ध रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात ही घटना घडली. या घटनेमुळे सोशल मीडिया वर्तुळात आणि सोलापूर जिल्ह्यात तीव्र हळहळ आणि खळबळ उडाली आहे.
घटना नेमकी काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे दोघे ब्रह्मपुरी येथील हॉटेलच्या ठिकाणीच एकत्र राहत होते. दर सोमवारी हॉटेलला साप्ताहिक सुट्टी असल्याने ते बंद असते. मात्र, मंगळवारी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडलेच गेले नाही. त्यानंतर दुपारी १ ते अडीच वाजण्याच्या सुमारास रोहिणीने हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या स्वयंपाक खोलीतील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
घटना समजताच पती निलेश पाराध्ये यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तात्काळ खाली उतरवून उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
आत्महत्येचे कारण काय?
रोहिणी पाराध्ये हिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्या पूर्व चिठ्ठी) मिळालेली नाही.मात्र, पोलीस सूत्रांकडून आणि स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेला विविध कंगोरे आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वाद/वैचारिक मतभेद आणि हॉटेल व्यवसायाचा वाढता आर्थिक व मानसिक तणाव या कारणांमुळे तिने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. रोहिणीचा हा दुसरा विवाह होता आणि त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. व्यवसायाच्या विस्ताराचे नियोजन सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
सोशल मीडियावरील ‘हिट’ जोडी
रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर कमालीचे लोकप्रिय होते. ग्रामीण जीवनशैली, विनोदी आणि सामाजिक विषय तसेच हॉटेलच्या स्वयंपाकघरात विविध खाद्यपदार्थ बनवतानाचे त्यांचे रिल्स इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत असत. त्यांच्या याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ सुरू केले होते, ज्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. ज्या स्वयंपाकघरातून त्यांनी लाखो चाहत्यांना खळखळून हसवणारे व्हिडिओ बनवले, त्याच ठिकाणी रोहिणीने आपला प्रवास संपवल्याने चाहते धक्काग्रस्त झाले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
याप्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी सध्या ‘आकस्मिक मृत्यू’ (AD) म्हणून नोंद केली आहे. आत्महत्येमागे नक्की कौटुंबिक कलह होता, आर्थिक ताण होता की अन्य काही खाजगी कारण, याचा शोध घेण्यासाठी मंगळवेढा पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.




